मुलांची भावनिक, मानसिक, सामाजिक वाढ निकोप व्हायला हवी असेल तर, पालकांना त्यांच्या भावभावना नेमक्या जाणुन घेता यायला हव्यात. पालक आणि मुलांमध्ये असलेले सुदृढ सुसंवादी नातं हा त्याचा पाया आहे. असं नातं निर्माण करणं हे सोपं नाही, पण, अशक्यही नक्कीच नाही!!.
मला वाटतं बहुतेक जणांनी “तारे जमीं पर” या आमिरखान दिग्दर्शित चित्रपटात लहान मुलांचे भावविश्व, त्याबरोबर जोडली गेलेली त्यांची मानसिकता, या सगळ्याकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोण, याचे एक सर्वांगसुंदर चित्र रेखाटलेले पाहिले आहे. ब-याचदा पालकांना असं वाटत असतं, की आम्ही मुलांना चांगल्या प्रकारे समजावून घेतो; म्हणजेच त्यांच्या प्रत्येक कृतिमागिल त्यांची मानसिकता आम्ही जाणतो. हे खरेच एव्हढे सोपे आहे? तर नाही असेच म्हणावे लागेल. पण ‘अशक्य’ मात्र नक्कीच नाही आणि यामध्ये एक महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे पालक आणि मुले यांच्यातील संवाद!